प्रतिनिधी : सागर मूलकला | पब्लिक समाचार न्यूजसिरोंचा, दि. ९ जून : सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे खंडित झालेला सिरोंचा तालुक्यातील विद्युत पुरवठा अखेर तब्बल २४ तासांनंतर सुरळीत करण्यात आला. मंगळवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने तालुक्यातील १०० हून अधिक गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.वादळी वाऱ्यामुळे वीजवाहिन्या आणि विद्युत यंत्रणांचे नुकसान झाल्याने संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा तसेच विविध व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम झाला होता. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल हवामानातही युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत विविध ठिकाणी निर्माण झालेले तांत्रिक बिघाड दूर केले. अखेर २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दीर्घकालीन वीज खंडितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासन व महावितरण विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.







