* सिरोंचा तालुक्यातील आदिवासी सहकारी धान खरेदी केंद्रांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, धान खरेदी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रब्बी व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन घेणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाही वेळेवर धान विक्री करता आली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले. मात्र शासनाकडून वेळेवर धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. विविध आंदोलने, निवेदने आणि मागण्यांनंतर अखेर पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली.धान खरेदी सुरू होताच शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी काही दलालांनी या परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. धान खरेदी केंद्रे सुरू होण्यापूर्वीच काही दलालांनी शेतकऱ्यांकडून कमी दराने धान खरेदी करून शासनाचे बारदाना उपलब्ध करून घेत मोठ्या प्रमाणात धान गोदामांमध्ये साठविल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आता धान खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हेच धान शासनाकडे विक्रीसाठी आणले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, पावसाळ्याला सुरुवात झाल्याने आणि अनेक ठिकाणी पुरेशी गोदाम व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे धान अद्याप खरेदीच्या प्रतीक्षेत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.धान विक्रीत विलंब झाल्यास आगामी खरीप हंगामातील रोवणी, बियाणे, खते व इतर शेती कामांसाठी आवश्यक निधी उभारणे शेतकऱ्यांसाठी कठीण होणार आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन धान खरेदी प्रक्रियेला गती द्यावी तसेच दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी सोशल मीडियाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.तसेच, दलालांना शासकीय गोदामांमध्ये धान साठवणूक करण्याची परवानगी नेमकी कोणी दिली, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणेच्या संगनमताशिवाय अशी साठवणूक शक्य नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सागर मूलकला यांनी केली आहे.







