सिरोंचा, प्रतिनिधी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या समजून घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाच्या पुढाकारातून बामणी सोसायटीचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे रब्बी हंगामानंतर निर्माण झालेल्या धान साठवणुकीच्या गंभीर समस्येवर मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बनय्या जनगाम, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, शहराध्यक्ष रवी सुलतान, सोसायटी अध्यक्ष चिन्ना पेंटा रामन्ना तलांडी, सचिव रामाराव बांदारी, दुर्गम बापू, दुर्गम शंकर, रमेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.रब्बी हंगामातील धान खरेदीनंतर हजारो क्विंटल धान साठवणुकीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला होता. पावसाळा तोंडावर असताना धान सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत होते. ही बाब लक्षात घेऊन बामणी सोसायटीच्या माध्यमातून धान साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे धान सुरक्षित राहण्यास मदत होणार असून आर्थिक नुकसान टाळण्यासही हातभार लागणार आहे.यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या अडचणी सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या साठवणूक, विपणन व पायाभूत सुविधांच्या समस्या सोडवण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.बामणी सोसायटीच्या उद्घाटनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
प्रतिनिधी : सागर मूलकला | पब्लिक समाचार न्यूज







