सागर मूलकला /सिरोंचा
सिरोंचा, प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेचा कणा म्हणून कार्य करणाऱ्या आशा वर्करांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अखेर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. भाकपा व आयटकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सिरोंचा तालुक्यातील पात्र आशा सेविकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे लेखी आदेश पंचायत समिती प्रशासनाने जारी केले आहेत.
या संदर्भात दि. ४ जून २०२६ रोजी भाकपा जिल्हा सहसचिव तथा आयटक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांना निवेदन सादर करण्यात आले होते. यावेळी भाकपा जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार, भाकपा तालुका सचिव कॉ. रवी बारसांगडी तसेच तालुक्यातील आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
निवेदनामध्ये कोरोना काळात कार्यरत असलेल्या आशा वर्करांना शासन निर्णयानुसार देय असलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत गटविकास अधिकारी यांनी सिरोंचा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पात्र आशा सेविकांना भत्ता अदा करण्याचे तसेच सात दिवसांच्या आत त्याबाबतचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात आशा वर्करांनी गावागावात सर्वेक्षण, रुग्ण शोध, लसीकरण, जनजागृती, क्वारंटाईन व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. संसर्गाचा धोका पत्करून केलेल्या या सेवेसाठी शासनाने प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे २८ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता मंजूर केला होता. मात्र हा भत्ता दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने आशा वर्करांमध्ये नाराजी होती.
दि. ११ जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत निर्णय जाहीर केल्याने आशा वर्करांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “आशा वर्करांच्या मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून निर्णय घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे. या प्रक्रियेत पंचायत समिती प्रशासनासोबतच सिरोंचा पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभले. आता दिलेल्या आदेशांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.”
या निर्णयामुळे तालुक्यातील आशा वर्करांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीचा मार्ग मोकळा झाला असून भाकपा व आयटकच्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना आशा वर्करांनी व्यक्त केली आहे.







