सिरोंचा, प्रतिनिधी : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानाच्या अनुषंगाने अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या असरअल्ली गावात विशेष एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. टीबीच्या दृष्टीने जोखीमग्रस्त गाव म्हणून असरअल्लीची निवड करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दि. 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 14 वर्षांवरील जोखीमग्रस्त नागरिकांची मोफत छातीची एक्स-रे तपासणी करण्यात येणार असून, संभाव्य टीबी रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू करण्याचा उद्देश आहे.
आरोग्य विभागाने संबंधित उपकेंद्रांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील जोखीमग्रस्त नागरिकांना शिबिरात उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 2025 व 2026 या कालावधीत टीबीचे उपचार सुरू असलेले तसेच उपचार पूर्ण झालेले सर्व रुग्णांनीही शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरादरम्यान संबंधित रुग्णांची माहिती आभा (ABHA) व निक्षय पोर्टलशी जोडण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे.
आरोग्य विभागाने असरअल्ली व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन टीबीमुक्त गाव घडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.







