सिरोंचा, प्रतिनिधी : ग्रामपंचायत नडीकुडा अंतर्गत सोलर प्लेटूरे गावात नागरिकांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन श्रीमती शशिकला सदवली कावेरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री मनोहर कावेरी, श्री श्याम कालवा, श्री अब्दुल अजीम तसेच ग्रामपंचायत सचिव श्री राजू आचला उपस्थित होते.कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.सौर ऊर्जेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे गावाला नियमित, अखंड आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून भविष्यातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या कामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







