* सिरोंचा, प्रतिनिधी सागर मूलकला : सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळाले. सभापती सतीश गंजीवार यांच्याविरोधात काही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर झालेल्या मतदानात गंजीवार यांना सभापती पद गमवावे लागले होते. त्यामुळे बाजार समितीतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलल्याचे चित्र निर्माण झाले होते.मात्र राजकारणात काहीही अशक्य नसते, याची प्रचिती आज पुन्हा एकदा सिरोंच्यात आली. नव्या सभापती व उपसभापती निवडीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत नव्या चेहऱ्याला संधी देत मधुकर कोल्लूरी यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. तर अविश्वासामुळे सभापती पद गमावलेले सतीश गंजीवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.अविश्वास प्रस्तावामुळे राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेले सतीश गंजीवार यांचे राजकीय पुनरागमन सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. सभापती पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतरही त्यांनी आपल्या समर्थकांची मोट बांधत नव्या सत्तासमीकरणाची यशस्वी जुळवाजुळव केल्याचे बोलले जात आहे.बाजार समितीतील या नाट्यमय घडामोडींमुळे विरोधकांना धक्का बसला असून, सत्ता बदलाच्या राजकारणात गंजीवार यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय वजन सिद्ध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अविश्वासाच्या धक्क्यानंतरही सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यात त्यांना यश आल्याने आगामी काळात बाजार समितीच्या राजकारणात आणखी नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सिरोंचा बाजार समितीतील या घडामोडींनी तालुक्याच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडवून दिली असून, “अविश्वासानंतरही सत्ता कायम” हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे.







