*
पोचमपल्ली (प्रतिनिधी) सागर मूलकला सिरोंचा : प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी ग्राम पंचायत गर्कापेठा अंतर्गत मौजा पोचमपल्ली येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना सकाळी ठीक ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, ग्रामस्थ वेळेवर उपस्थित राहूनही संबंधित ग्राम पंचायत सचिव नियोजित वेळेत न आल्याने ग्रामसभेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आदर्श ग्राम योजनेचा आराखडा तयार करणे, गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणे आणि नागरिकांच्या सूचना नोंदविणे हा सभेचा मुख्य उद्देश होता. मात्र सचिवांनी निर्धारित वेळेचे पालन न करता दुपारच्या सुमारास गावात येऊन घाईगडबडीत सभा पार पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, “ग्रामसभा ही लोकशाही व्यवस्थेचा पाया असताना अधिकारीच नियमांना हरताळ फासत असतील तर विकास आराखड्याची पारदर्शकता कशी राहणार?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनेबाबत ग्रामस्थांच्या सूचना, अपेक्षा आणि विकासविषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित मनमानीमुळे ग्रामसभेचा मूळ उद्देशच बाजूला पडल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ग्रामसभेच्या आयोजनाबाबत चौकशी करावी तसेच ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.







