सिरोंचा, प्रतिनिधी :तालुक्यात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विविध भागातील ताजियांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. मिरवणुकीत विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.मोहरम निमित्त शहरातील प्रमुख मार्गांवर ताजियांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी ताजियांचे दर्शन घेत श्रद्धापूर्वक अभिवादन केले.उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. स्थानिक प्रशासन, पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी उत्सव शांततेत पार पडण्यासाठी विशेष सहकार्य केले.मोहरमच्या निमित्ताने सिरोंच्यात धार्मिक सौहार्द, सामाजिक ऐक्य आणि परस्पर बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले. शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात उत्सव पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.







