सिरोंचा | प्रतिनिधी / सागर मूलकला,राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सिरोंचा येथील शासकीय रुग्णालयात पल्स पोलिओ दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. पद्माताई भोगे यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब आवर्जून पाजण्याचे आवाहन केले. पोलिओसारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी प्रत्येक पालकाने जबाबदारीने सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आरोग्य विभागाच्या वतीने अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवकांनी बालकांपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.”प्रत्येक बालक निरोगी, पोलिओमुक्त भारत हीच आपली सामूहिक जबाबदारी” हा संदेश देत उपस्थितांनी सर्व पालकांनी आपल्या प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानामुळे देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, या मोहिमेला सिरोंचा तालुक्यातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.







