सागर मूलकला / प्रतिनिधी
सिरोंचा प्रतिनिधी : सिरोंचा तालुक्यातील कोत्तागुडाम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या प्रारंभी पारंपरिक धार्मिक श्रद्धेने ‘तेलगू भवनिक सल्लाबॉडी (डोरातांबलू)’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.या पारंपरिक विधीनिमित्त गावकऱ्यांनी विशेष पूजा-अर्चेचे आयोजन केले होते. या पूजेसाठी पारंपरिक पद्धतीने विधी करणाऱ्या पांबाला समाजातील पूजाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते गावाच्या शेवटच्या रस्त्यावर तेलगू भवनिक सल्लाबॉडी (डोरातांबलू) उभारून धार्मिक विधी पार पाडण्यात आला.या धार्मिक परंपरेमागे गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, गावावर कोणतेही संकट किंवा साथीचे आजार येऊ नयेत तसेच पावसाळा सुख-समृद्धीचा जावा, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात येते. अनेक वर्षांपासून ही परंपरा गावात अखंडपणे जपली जात असून, ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभागी होतात.यावेळी कोत्तागुडाम येथील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.







