सागर मूलकला. सिरोंचा
सिरोंचा प्रतिनिधी : पेंटीपाका येथील आदिवासी लक्ष्मी महिला मंडळ बचत गटाने पेसा मोबिलायझर पदाची जबाबदारी आपल्या गटाला देण्याची मागणी करत गटविकास अधिकारी (BDO) यांना निवेदन सादर केले आहे. मागणी मान्य न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, लक्ष्मी महिला मंडळ बचत गटाची स्थापना सन २००६ मध्ये झाली असून गेल्या २० वर्षांपासून गटातील ११ आदिवासी महिला विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवत आहेत. सन २००९ मध्ये आदिवासी समाजातील अनेक जोडप्यांचे सामूहिक विवाह आयोजित करण्यात आले. तसेच लांबडपल्ली, मुगापूर आणि पेंटीपाका येथील अंगणवाड्यांमधील बालकांना एक वर्षभर पोषण आहार उपलब्ध करून देण्यात आला. याशिवाय सोसायटीमार्फत धान खरेदी-विक्री तसेच इतर अनेक समाजोपयोगी उपक्रमही बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात आले.बचत गटाने शासनाकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. मात्र, पंचायत समितीमार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या पेसा मोबिलायझर पदासाठी २० वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या या आदिवासी बचत गटाकडे दुर्लक्ष करून तुमनूर ग्रामपंचायतीतील शिवानी महिला मंडळ बचत गटाची निवड करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे.यामुळे आपल्या गटावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत पेसा मोबिलायझर पदाची जबाबदारी तातडीने लक्ष्मी महिला मंडळ बचत गटाला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व आदिवासी महिला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.







