प्रतिनिधी सागर मूलकला :सिरोंचा शहर ते धर्मापुरी गावादरम्यानच्या मुख्य मार्गावर रस्त्यालगत विद्युत दिवे (स्ट्रीट लाईट) बसविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रवी सुलतान यांनी केली आहे.याबाबत त्यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन देत सांगितले की, सिरोंचा–धर्मापुरी हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून या रस्त्यावर दिवसभर तसेच रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि नागरिकांची ये-जा असते. मात्र, रस्त्यावर पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने रात्री अपघात होण्याचा धोका निर्माण होत असून वाहनचालक व पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.रस्त्यावर विद्युत दिव्यांची सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल, अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच परिसरातील सुरक्षाही वाढेल. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन संबंधित विभागाने या मार्गावर तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी रवी सुलतान यांनी केली आहे.स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवित प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







