सिरोंचा | प्रतिनिधी, सागर मूलकला
नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार व नगरसेवक इम्तियाज खान यांनी शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पथदिव्यांची दुरुस्ती तसेच आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत मुख्याधिकारी राजू सिडाम यांना दिलेल्या निवेदनाची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. त्यानुसार शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम व बंद पडलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून शहरातील नाल्यांमध्ये साचलेला गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू असून रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे, पालापाचोळा व इतर कचरा हटविण्यात येत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी बंद पडलेले स्ट्रीट लाईट दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व शहराची स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.याबाबत नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार व नगरसेवक इम्तियाज खान यांनी नगरपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच शहरातील उर्वरित भागात फॉगिंग व ब्लीचिंग पावडर फवारणीचे कामही तातडीने पूर्ण करून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी त्यांनी केली.नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तत्परता दाखविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वयातून शहरातील विविध नागरी समस्यांचे निराकरण अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







