सिरोंचा (प्रतिनिधी): सिरोंचा तालुक्यातील वाढती लोकसंख्या, रुग्णांची वाढती संख्या आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येथील ग्रामीण रुग्णालयाचे तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व सिरोंचाचे माजी उपसरपंच रवि सल्लम यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार नरेंद्र एस. हलामी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक (सर्जन), भूलतज्ज्ञ यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. परिणामी गंभीर रुग्णांना उपचारासाठी तेलंगणातील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, एमबीबीएस डॉक्टर, सहाय्यक अधीक्षक व इतर महत्त्वाची पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. ही सर्व रिक्त पदे तातडीने भरून ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी राज्य शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव सादर करून या प्रक्रियेला गती द्यावी, जेणेकरून सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व सर्व सुविधा असलेली आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.सरकारकडून या मागणीची दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.नायब तहसीलदार नरेंद्र एस. हलामी यांना निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांच्यासह किरणकुमार वेमूला, वसंत डुरके, संपत गोगुला आदी उपस्थित होते.







