सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा; पेंटीपाका बसस्टॉपजवळ सकाळी ७ वाजल्यापासून वाहतूक ठप्प करण्याचा निर्णय
सिरोंचा | प्रतिनिधी : सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही शासनाकडून खरेदी करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. यासंदर्भात अनेक वेळा अर्ज, निवेदने व शासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत शेतकरी आंदोलन समितीने आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ (सिरोंचा–आसरेली मार्ग) वरील पेंटीपाका गाव बसस्टॉपजवळ पूर्णतः रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.धान खरेदीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे. तसेच या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.







