पेंटीपाका बसस्टॉपजवळ वाहतुकीवर परिणाम; मंत्रालयाशी चर्चा करून मागणी पूर्ण करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्वासन
सिरोंचा | प्रतिनिधी , सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्याप शासनाकडून खरेदी करण्यात आले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी २४ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ (सिरोंचा–आसरआल्ली मार्गवरील पेंटीपाका गाव बसस्टॉपजवळ रास्ता रोको आंदोलन छेडले. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.धान खरेदी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी किसान आघाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदने, अर्ज आणि शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. शासनाने धान खरेदीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.आंदोलनाची माहिती मिळताच सिरोंचाचे नायब तहसीलदार पारदि, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सिडाम आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज धाहारे तसेच अहेरी धान्य निरीक्षक अधिकारी राजूरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा घडवून आणली.यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र मंत्रालयाशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या धान खरेदीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी पुढील भूमिका जाहीर करण्याबाबत निर्णय राखून ठेवला.दरम्यान, आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिरोंचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मारुती नांदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली असली, तरी धान खरेदीचा प्रश्न तातडीने निकाली न निघाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.







