अनेक गावांशी संपर्क विस्कळीत; पाणीपुरवठा, मोबाईल नेटवर्क व दैनंदिन जनजीवनावर परिणाम
सिरोंचा, प्रतिनिधी : सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत यंत्रणेला मोठा फटका बसला असून मागील 24 तासांहून अधिक काळापासून शहरासह अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या व विद्युत खांबांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे कठीण जात असून, पावसाचा जोर कमी होताच युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा तसेच लहान व्यावसायिकांचे व्यवहारही ठप्प झाले आहेत. रात्रीच्या अंधारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







