सागर मूलकला ,सिरोंचा
सिरोंचा, दि. ३ ऑगस्ट : नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. ०६ मध्ये रामुलु बाजारु येरोला यांच्या घरासमोरून संडासाचे सांडपाणी थेट सार्वजनिक रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांना तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते राजेश बद्दी यांनी नगराध्यक्ष, नगरपंचायत सिरोंचा यांना निवेदन देऊन या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागामार्फत कायमस्वरूपी उपाययोजना करून रस्त्यावर वाहणारे सांडपाणी त्वरित बंद करावे, तसेच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.







