प्रतिनिधी,सागर मूलकला
सिरोंचा, दि. ३ ऑगस्ट : सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका गावाजवळील नदीपात्रात दुर्मिळ जातीचा मासा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अनोख्या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली.स्थानिक मच्छीमारांना मासेमारीदरम्यान हा मासा जाळ्यात अडकला. आकाराने आणि रंगरूपाने इतर माशांपेक्षा वेगळा असल्याने हा मासा दुर्मिळ असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोबाईलद्वारे छायाचित्रे व व्हिडिओ काढले.या माशाची नेमकी प्रजाती कोणती आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र मत्स्य विभाग किंवा संबंधित तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच त्याची खात्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, पेंटीपाका परिसरातील नदीत दुर्मिळ मासा आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.







