सागर मूलकला सिरोंचा, प्रतिनिधी
बोरगुडाम फाट्याजवळील नदीपात्रात आढळला मृतदेह ; ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न
सिरोंचा, दि. ४ :सिरोंचा तालुक्यातील बोरगुडम फाट्याजवळ पुराच्या पाण्यामुळे एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.घटनास्थळ पंचनाम्यानुसार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी बोगुडाम फाट्याजवळील परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह दिसून आला. माहिती मिळताच संबंधित अधिकारी, पंच व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत मृतदेहाची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४४ वर्षे असून उंची सुमारे १६५ सें.मी. असल्याची नोंद आहे. मृतदेह काही दिवसांपासून पाण्यात असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अंगावरील कपडे व शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतदेहाच्या शरीरावर काही ठिकाणी दुखापतींच्या खुणा असल्याचीही नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील पोलीस ठाण्यांशी संपर्क साधण्यात येत असून, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे. ओळख पटविल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.







