सिरोंचा, प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पक्ष संघटना मजबूत करण्यातील सक्रिय योगदानाच्या जोरावर सौ. ललिता शंकर चल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.पोचमपल्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून कार्य करताना सौ. चल्ला यांनी गावाच्या विकासाबरोबरच महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचविणे, त्यांना स्वावलंबी बनविणे आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.यापूर्वी तालुका कापेवार समाजाच्या महिला अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावत समाजातील महिला व युवकांना संघटित करण्याचे कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षाच्या विचारांचा प्रसार करत संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने योगदान दिले. कार्यकर्त्यांशी समन्वय, महिलांचा वाढता सहभाग आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांच्यावर महिला तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम होईल तसेच महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त कापेवार समाजाने व्यक्त केला आहे.







