प्रतिनिधी,सागर मूलकला/ सिरोंचा
सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लांबडपल्ली गावात रात्रीच्या सुमारास घर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मलय्या गर्कपेठा यांचे घर पूर्णपणे कोसळले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना मलय्या गर्कपेठा हे नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपले होते. रात्रीच्या दरम्यान अचानक घराचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घर कोसळल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक कच्च्या घरांना धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने अशा धोकादायक घरांची पाहणी करून आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.या घटनेमुळे लांबडपल्ली गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.







