प्रतिनिधी – सागर मूलकला, सिरोंचा
सिरोंचा : जाफराबाद ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीवरून सुरू झालेला वाद आता अधिक चिघळला आहे. तक्रारदार आनंदराव आशा यांनी ग्रामपंचायतीत निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. मात्र, सुनावणीनंतर संबंधित कागदपत्रांची पाहणी करून तक्रार फेटाळण्यात आल्याचा दावा सरपंच स्वामी गोदारी यांनी केला आहे. त्यानंतर आता पैशांच्या कथित मागणीवरून दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप केले जात आहेत.सरपंच स्वामी गोदारी यांनी माध्यमांसमोर येत आनंदराव आशा यांनी तक्रार पुढे न नेण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप केला. पैसे न दिल्यास उच्चस्तरीय तक्रार करणे, सोशल मीडियावर बदनामी करणे तसेच न्यायालयात जाण्याची धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात काही फोन-पे व्यवहारांचे पुरावे असल्याचे सरपंचांनी सांगितले.
🚨‘ *मी पैशांची मागणी केली नाही’ — आनंदराव आशा*
👇दरम्यान, तक्रारदार आनंदराव आशा यांनी माध्यमांसमोर येऊन सरपंचांचे आरोप फेटाळले. “सरपंच स्वामी गोदारी यांनी मला कोणतेही पैसे दिलेले नाहीत. संतोष तोटा यांच्या फोन-पे क्रमांकावर पैसे पाठविल्याचे पत्र दाखवून मला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी सरपंचांकडे पैशांची कोणतीही मागणी केलेली नाही,” असा दावा त्यांनी केला.
🚨 *‘४ हजार रुपये जाहिरातीच्या बिलापोटी’ — रवी बरसागडी*
👇सरपंचांनी ज्या रवी बरसागडी यांच्या फोन-पे क्रमांकावर 4 हजार रुपये दिल्याचा उल्लेख केला होता, त्यांनीही माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. *“मला 4 हजार रुपये सरपंच स्वामी गोदारी यांनी दिले हे सत्य आहे; मात्र ते पैसे तेंदूपत्ता लिलावाच्या जाहिरातीच्या बिलापोटी देण्यात आले आहेत,”* असे त्यांनी सांगितले.तेंदूपत्ता लिलावाची ग्रामपंचायत स्तरावरील जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. त्याचे एकूण बिल 15 हजार रुपये झाले असून, त्यापैकी 4 हजार रुपये फोन-पेद्वारे मिळाले आहेत. *अजून 11 हजार रुपये सरपंचांकडून येणे बाकी असल्याचा दावा रवी बरसागडी यांनी केला.*
🚨*ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचेही गंभीर आरोप*
👇या प्रकरणात आता जाफराबाद ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांनीही माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे.या कर्मचाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, *रवी बरसागडी आणि आनंदराव आशा यांनी त्यांच्याकडेही पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास आपल्याविरोधात तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप* त्यांनी केला आहे.त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळाले असून, केवळ 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या तक्रारीपुरता हा वाद मर्यादित न राहता कथित पैशांची मागणी, फोन-पे व्यवहार आणि तक्रारीच्या माध्यमातून दबाव आणल्याच्या परस्पर आरोपांपर्यंत पोहोचला आहे.
🚨*निष्पक्ष चौकशीची गरज*
👇एका बाजूला आनंदराव आशा यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप फेटाळला आहे, तर दुसरीकडे सरपंचांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी व धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. रवी बरसागडी यांनी मात्र 4 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे मान्य करून तो जाहिरातीच्या बिलापोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे *संतोष तोटा यांच्या फोन-पे क्रमांकावरील कथित व्यवहार, 4 हजार रुपयांचा व्यवहार, तेंदूपत्ता जाहिरातीचे 15 हजार रुपयांचे बिल, तसेच संबंधित व्यक्तींनी केलेल्या पैशांच्या मागणीच्या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे* .या प्रकरणातील सर्व आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच सत्य परिस्थिती समोर येणार आहे. संबंधित सर्व व्यक्तींचे जबाब, फोन-पे व्यवहारांचे रेकॉर्ड, जाहिरातीचे बिल तसेच ग्रामपंचायतीच्या अधिकृत कागदपत्रांची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.
🚨 *तक्रारींच्या वादाचा ग्रामपंचायत विकासकामांवर परिणाम होत असल्याची गावकऱ्यांची भावना*
👇ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य वापर होऊन गावातील रस्ते, नाली, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत विकासकामे वेळेत होणे गरजेचे आहे. मात्र, सततच्या तक्रारी आणि त्यावरून सुरू असलेल्या वादामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे,” अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली.
टीप : या बातमीत नमूद केलेले पैशांची मागणी, धमकी व गैरव्यवहाराचे आरोप संबंधित व्यक्तींनी केलेले दावे आहेत. त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.







