प्रतिनिधी – सागर मूलकला,सिरोंचा
सिरोंचा : ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना आपल्या क्रिकेट कौशल्याला वाव मिळावा आणि होतकरू क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो सिरोंचा’ अंडर-१९ क्रिकेट टूर्नामेंटला उत्साहात सुरुवात झाली.एफ.सी.डी. ग्राउंड, सिरोंचा येथे ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नगरपंचायत सिरोंच्याच्या अध्यक्षा सौ. पद्माताई सतीश भोगे यांच्या हस्ते स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनावेळी युवा क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.या सोहळ्यास नगरसेवक सतीश भाऊ भोगे, नरेश अलोणे, रंजित गागापुरवार, सतीश भाऊ रचर्लावार, इम्तियाज खान, शहर अध्यक्ष रवि सुल्तान, तसेच भगवान काका पिल्लीवार, माजी नगराध्यक्ष राजू भाऊ पेद्दापल्ली आणि माजी नगरसेवक विजय भाऊ तोकला यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ₹२०,००१ नगरपंचायत सिरोंच्याच्या अध्यक्षा सौ. पद्माताई सतीश भोगे यांच्याकडून, तर द्वितीय पारितोषिक ₹१०,००१ राममंदिर समिती सिरोंचा यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच युवा-११ मंडळाच्या वतीने प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहेत.उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी युवा खेळाडूंशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांनी खेळाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आपल्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या स्पर्धेमुळे सिरोंचा तालुक्यातील युवा क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखविण्याची मोठी संधी मिळणार आहे. आगामी काळात सिरोंच्यातून दर्जेदार क्रिकेटपटू घडण्यास या स्पर्धेचा निश्चितच फायदा होईल. उद्घाटनानंतर मैदानावर सुरू झालेल्या सामन्यांमुळे सिरोंचा परिसरात क्रिकेटचा थरार रंगला असून, युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.







