प्रतिनिधी – सागर मूलकला,सिरोंचा
सिरोंचा : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत प्राप्त झालेल्या वैयक्तिक वनहक्क दाव्यांमधील त्रुटी दूर करून प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मोक्का पंचनामा, नमुना-अ, GPS नकाशा तसेच Google Map उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत १२ ऑगस्ट २०२६ रोजी सिरोंचा वन विभागाच्या उपवनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. संबंधित वनहक्क दाव्यांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना कार्यालयीन स्तरावर योग्य सहकार्य मिळावे, तसेच कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचविताना अनावश्यक विलंब होऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.सिरोंचा, आसरअल्ली आदी कार्यालयांशी संबंधित वनहक्क दाव्यांमध्ये मोक्का पंचनामा, नमुना-अ, GPS नकाशा व Google Map यांसारखी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देऊन प्रलंबित दाव्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे.माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण काका येरावार, अनुसूचित जाती व जनजाती विकास परिषद तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश बोगे आणि शहराध्यक्ष रवी सुलतान यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर, बापू दुर्गम, श्रीनिवास सुंकरी, सालय्या डेब्बा तसेच गार्कपेठ ग्रामपंचायतीचे सर्व गावकरी उपस्थित होते.यावेळी राकपेंठा व पोचमपल्ली परिसरातील १२ नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून वन विभागाकडे आपल्या मागण्या नोंदविल्या. वनहक्क दाव्यांतील त्रुटी दूर करून प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी आणि पात्र लाभार्थ्यांना वनहक्काचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.







