प्रतिनिधी – सागर मूलकला,सिरोंचा
सिरोंचा : शहरातील मुख्य मार्गालगत साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अखेर सिरोंचा नगरपंचायतीने त्याची गंभीर दखल घेतली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन *नगराध्यक्षा सौ. पद्माताई बोगे* यांनी पुढाकार घेत संबंधित परिसराची स्वच्छता करण्याच्या सूचना देत काम पूर्ण करून घेतले. त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.छत्तीसगड तसेच अंकिसा-आसरअल्ली मार्गाला जोडणाऱ्या सिरोंच्याच्या मुख्य मार्गालगत कचरा साचल्याने हा परिसर अक्षरशः डम्पिंग यार्डचे स्वरूप धारण करत होता. याच मार्गावर कार्मेल अकॅडमी शाळा असल्याने दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि अस्वच्छता ही केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून नागरिकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर समस्या बनली होती.या समस्येबाबत काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या मागणीची तसेच सोशल मीडियावर नागरिकांकडून व्यक्त झालेल्या संतापाची दखल घेत नगराध्यक्षा सौ. पद्माताई बोगे यांनी तातडीने पुढाकार घेतला.नगराध्यक्षा यांच्या पुढाकाराने डम्पिंग यार्ड परिसरातील कचरा हटविण्याचे तसेच मुख्य मार्गालगतची अस्वच्छता दूर करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष कृती केल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे, याच परिसराच्या जवळ महान वीर बाबुराव शेडमाके आणि क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्याशी संबंधित प्रेरणास्थळे असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी सातत्याने होत होती. महापुरुषांच्या प्रेरणास्थळांच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणे ही निश्चितच लाजिरवाणी बाब होती. मात्र आता स्वच्छता मोहीम राबवून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये आणि शाळकरी विद्यार्थ्यांना पुन्हा दुर्गंधी व अस्वच्छतेच्या वातावरणातून जावे लागू नये, यासाठी कचरा व्यवस्थापनाची शाश्वत यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. नगराध्यक्षा पद्माताई बोगे यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच सकारात्मक असला तरी आता ही स्वच्छता केवळ फोटोपुरती न राहता कायमस्वरूपी टिकविण्याची जबाबदारी नगरपंचायतीसमोर आहे.







