मिलिंद बहुउद्देशीय विकास मंडळाचे नगरपंचायतीला निवेदन; नामकरणाच्या मागणीला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी – सागर मूलकला.सिरोंचा
सिरोंचा | १३ ऑगस्ट २०२६ : भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सिरोंचा शहरातील मुख्य चौकाला ‘संविधान चौक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मिलिंद बहुउद्देशीय विकास मंडळ, सिरोंचा यांच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सिरोंचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ . पद्माताई सतीश बोगे यांना निवेदन सादर करण्यात आले. नगरसेवक तथा बांधकाम सभापती नरेश अलोने यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले. सिरोंचा शहरातील न्यायाधीशांच्या निवासस्थानासमोरील मुख्य चौकाला ‘संविधान चौक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असून, संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या चौकाचे नामकरण महत्त्वाचे ठरेल. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी तसेच संविधानिक मूल्यांचा सन्मान करण्यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बनय्या जनगम, नगरसेवक सतीश बोगे, अमृतराव वडके, दुर्गम सर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी सुलतान, नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजू पेद्दपल्ली, नगरसेवक जगदीश रालबंडीवार, सामाजिक कार्यकर्ते नागेश दुग्याला आणि पोचम अकुदारी यांची उपस्थिती होती.चौकाला ‘संविधान चौक’ असे नामकरण करून संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा आणि नगरपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.







