महामार्गावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांचा जीव धोक्यात; श्रीकांत सुगरवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सागर मूलकला सिरोंचा प्रतिनिधी
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील प्रमुख गाव असलेल्या असरअली येथे अद्याप स्वतंत्र एसटी बसस्थानक नसल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, असरअली येथे एसटी बसस्थानकाची इमारत तातडीने मंजूर करून बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे तहसीलदार, सिरोंचा यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे. असरअली हे मोठे गाव असून, नव्याने तालुका म्हणून घोषित झाल्यामुळे येथे नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र बसस्थानकाची सुविधा नसल्याने प्रवाशांना महामार्गाच्या कडेला बसची वाट पाहावी लागते.राष्ट्रीय महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी बसस्थानकाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.असरअली पोलीस ठाण्याच्या बाजूला महसूल विभागाची शासकीय जमीन उपलब्ध असल्याने या ठिकाणी एसटी बसस्थानक उभारण्यासाठी जागेची अडचण नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सदर कामाचा तातडीच्या व आवश्यक कामांच्या यादीत समावेश करून बसस्थानकाच्या बांधकामास मंजुरी द्यावी, अशी विनंती श्रीकांत सुगरवार यांनी केली आहे.







