प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी २४ ऑगस्टपासून आंदोलन; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
प्रतिनिधी : सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला कॅडर व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत उमेद महिला कॅडर संघटनेच्या वतीने सिरोंचा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक व गटविकास अधिकारी यांच्याकडे यापूर्वी मागण्यांबाबत निवेदने देण्यात आली आहेत. तसेच संबंधित बैठकी व चर्चांनंतरही मागण्यांवर अपेक्षित निर्णय झालेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये गाव व प्रभाग स्तरावर कार्यरत उमेद कॅडरचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचा विमा अथवा सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत शासन निर्णय तातडीने लागू करणे, मागील काही महिन्यांपासून प्रलंबित मानधन अदा करणे, तसेच उमेद अभियानाला ग्रामविकास विभागाचा कायमस्वरूपी उपविभाग म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय ग्रामसखींचे मासिक मानधन १५ हजार रुपये, प्रभाग संघ स्तरावरील कॅडरचे मानधन २४ हजार रुपयांपर्यंत वाढविणे, कामासाठी अतिरिक्त प्रवास भत्ता देणे, मासिक ऐवजी त्रैमासिक मानधन देण्याची व्यवस्था करणे, तसेच प्रभाग समन्वयक व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह विविध मागण्यांचा समावेश आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय होईपर्यंत गाव व प्रभाग स्तरावरील भौतिक कामे सुरू ठेवून ऑनलाइन कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.“मागण्या मान्य होईपर्यंत ऑनलाइन काम बंद राहील” अशी भूमिका संघटनेने घेतल्याने उमेद अभियानाच्या ऑनलाइन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.







