प्रतिनिधी सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : शासनाच्या विविध योजना, पीक कर्ज व इतर कृषीविषयक लाभांसाठी ई-पीक नोंदणी महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी शेतकरी स्वतः शेतात जाऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून पिकांची लाईव्ह छायाचित्रे व आवश्यक माहिती अपलोड करून ई-पीक नोंदणी करीत होते. मात्र, यंदा महसूल विभागाकडून विविध विभागातील कर्मचाऱ्यांची ‘ई-पीक पाहणी सहाय्यक’ म्हणून नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून नोंदणी केली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.सिरोंचा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वेळेत पाहणी करून ई-पीक नोंदणी केली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नोंदणीसाठी संबंधित पाहणी सहाय्यकांच्या वारंवार मागे लागावे लागत असून, तरीही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.महसूल विभागाने ई-पीक नोंदणीची जबाबदारी पाहणी सहाय्यकांकडे सोपवल्याने काही ठिकाणी कामकाजात विलंब होत असून, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ई-पीक नोंदणी वेळेत न झाल्यास शासनाच्या विविध योजनांपासून तसेच पीक कर्जासह संबंधित कृषी लाभांपासून काही शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई-पीक नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच सध्या नियुक्त केलेल्या ई-पीक पाहणी सहाय्यकांकडून प्रलंबित नोंदणीची कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा, अशीही मागणी होत आहे.महसूल विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन ई-पीक नोंदणीची प्रक्रिया सुलभ करावी आणि एकही पात्र शेतकरी ई-पीक नोंदणीअभावी शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.







